महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात अत्यंत अग्रेसर असून देशात शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे राज्य ठरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शिक्षण क्षेत्राबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्र सरकार दरवर्षी केजी टू पीजी (KG to PG) शिक्षणासाठी तब्बल 90 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद बजेटमध्ये करते. शिक्षणावर केला जाणारा खर्च हा केवळ खर्च नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मानव संसाधनाच्या निर्मितीसाठी केलेली एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे,” असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
हेही वाचा – शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात यंदा मोठा बदल! यंदा सेलिब्रिटींचे कार्यक्रम रद्द, कारण काय?
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल
आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्यामुळे परकीय थेट गुंतवणुकीत (FDI) राज्य सध्या संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील बळीराजाला सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महायुती सरकारने अनेक क्रांतिकारी व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री स्वतः शिक्षक व पदवीधर निवडणुकीकडे लक्ष देत असून, पुण्यातील या दोन्ही जागांवर महायुती ताकदीने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पदवीधर आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
महायुतीच्या उमेदवारांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, उमेदवारांकडे काम करण्याची तीव्र जिद्द, योग्य दिशा आणि स्पष्ट दृष्टी आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या आशीर्वादाने हे उमेदवार निवडून आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील आणि पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न निश्चितच मार्गी लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.