नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबई आणि ठाण्यात ‘लोकशाही बचाव’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत सहभागी होत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. ‘काँग्रेस पक्षाचे देशातील लोकशाही संपवण्याचे आणि सत्ता उलथवून टाकण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पायाखाली तुडवले आहे,’ असा गंभीर आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
‘भारतात बाबासाहेबांचे संविधान आहे, हा बांगलादेश किंवा नेपाळ नाही’
पदयात्रेदरम्यान जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात अराजकता पसरवण्याचा आणि सत्तापालट करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. “हा भारत देश आहे, इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्वसमावेशक संविधान लागू आहे. हा बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंका नाही, जिथे सहजासहजी अराजकता माजवली जाईल. राहुल गांधी, तुमच्या आजीनेही (इंदिरा गांधी) देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, मात्र देशातील जनतेने तो उधळून लावला,” असा थेट टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसने संविधानाचे हक्क हिरावले
इतिहासाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात संविधानात बदल करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ तत्त्वांना नख लावले. “बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील गल्लीतल्या सामान्य आणि गरीब माणसाला तोच अधिकार दिला होता, जो देशाच्या पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना आहे. मात्र, काँग्रेसने देशाच्या संविधानात बदल करून पंतप्रधानांना संविधानाच्याही वर नेऊन बसवण्याचे पाप केले. त्यामुळे काँग्रेसनेच खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या संविधानाचा अनादर केला आहे,” असे ते म्हणाले.
हेही वाचा – गोकुळच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपणार? हायकोर्टाचा मोठा निर्णय, या दिवशी ठरणार नवा अध्यक्ष
‘संविधान रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय’
काँग्रेसकडून केवळ सत्तेसाठी लोकशाहीचा बुरखा पांघरला जात असल्याचा दावा करत फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भाजप ही देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष देशाची बदनामी करण्याचे काम परदेशात आणि देशात करत असून, भारतीय जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना लोकशाहीच्या संरक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.