ठाण्यात महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव पदयात्रेत’ बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाची खरी लढाई भारतीय जनता पक्ष किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नसून, ती देशाच्या अखंडतेशी आणि भारतीय संविधानाशी आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळातच देशात संविधानाची पायमल्ली करून लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावाही त्यांनी या प्रसंगी केला.
इतिहास साक्षी आहे; आणीबाणीत संविधानाची मोडतोड
आपल्या भाषणात आणीबाणीच्या काळातील घटनांचा दाखला देत फडणवीस म्हणाले की, 1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेस सरकारने स्वतःचा बचाव करण्यासाठी 39 वी घटनादुरुस्ती आणली. न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणत पंतप्रधानांच्या निवडणुकीला आव्हान देण्याच्या प्रक्रियेतच बदल करण्यात आले. 1977 मध्ये जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हा 44 व्या घटनादुरुस्तीद्वारे या जाचक तरतुदी मागे घेण्यात आल्या. त्यामुळे ज्या काँग्रेसने 42 व्या घटनादुरुस्तीने न्यायालयाचे अधिकार मर्यादित केले, ते आज संविधानाच्या रक्षणाची भाषा करत आहेत ही हास्यास्पद बाब आहे.
राहुल गांधींवर गंभीर आरोप आणि ‘लाल पुस्तका’चे रहस्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधत फडणवीस म्हणाले की, देशात अराजकता पसरवण्यासाठी एका विशिष्ट ‘लाल पुस्तका’चा मुखवटा म्हणून वापर केला जात आहे. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली, तशीच रणनीती हातात लाल पुस्तक घेऊन भारतात राबवण्याचा कट रचला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या स्वायत्त घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे काम विरोधी पक्षांकडून सुरू आहे. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि काँग्रेसला मिळणाऱ्या कथित विदेशी निधीवरही त्यांनी या वेळी तीव्र शंका उपस्थित केली. दारू तीच आहे, फक्त बॉटल बदलली आहे. आता निती बदलली आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
महायुतीचे प्रमुख नेते पदयात्रेत सहभागी
ठाण्यातील या भव्य पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, आमदार प्रताप सरनाईक, जयकुमार रावल यांच्यासह महायुतीचे अनेक खासदार, आमदार आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.