आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ या दोन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीच आपला उमेदवार उभा करेल, असा ठाम दावा भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. मागील निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला असला, तरी आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते लाड आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये दाखल झाले आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे या जागेवर भाजपचाच नैसर्गिक दावा बनतो, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. वरिष्ठांच्या निर्णयानुसार दोन्ही मतदारसंघांत पक्ष ताकदीने उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’ दूध संघाच्या जागावाटपावर महायुतीची खलबते
कोल्हापूरची अस्मिता असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत बोलताना खासदार महाडिक यांनी महायुतीच्या रणनीतीवर प्रकाश टाकला. महायुतीतील सर्व घटक पक्ष म्हणजेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सर्व पक्षांनी आपापल्या संस्था आणि ठरावांच्या आधारे जागांची मागणी केली आहे. हसन मुश्रीफ यांनी 10 जागांची, भाजपने 8, शिवसेनेने 8 तर जनसुराज्य पक्षाने 3 जागांची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम
जागावाटपावरून घटक पक्षांमध्ये विविध मागण्या असल्या तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत सर्व पक्षांचे प्रस्ताव पाहून मुख्यमंत्री सर्वमान्य तोडगा काढतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. पूर्वी गोकुळच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर न होता स्थानिक गटांवर लढवल्या जात असत. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येत पॅनल उभे केले होते. त्याच धर्तीवर आता महायुती म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवतील, असे महाडिक यांनी नमूद केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.