‘मला अटक नव्हे, तर माझं अपहरण…’; CJP च्या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर ध्रुव राठीचा गंभीर आरोप

आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच, लोकप्रिय युट्युबर ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. आता सुटकेनंतर ध्रुव राठी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्यावर झालेली कारवाई ही नसून थेट "अपहरण" असल्याचे म्हटले आहे.
‘मला अटक नव्हे, तर माझं अपहरण…’; CJP च्या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर ध्रुव राठीचा गंभीर आरोप
Dhruv Rathee

नवी दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो जंतर-मंतर’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि खळबजनक घटना समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आणि मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच, लोकप्रिय युट्युबर ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. आता सुटकेनंतर ध्रुव राठी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्यावर झालेली कारवाई ही नसून थेट “अपहरण” असल्याचे म्हटले आहे.

‘मला अटक नव्हे, तर माझे अपहरण झाले होते’

रविवारी, 11 ऑक्टोबर रोजी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत ध्रुव राठी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिले की, “मला कोणतीही अधिकृत अटक किंवा ताब्यात घेण्यात आले नव्हते, तर माझे थेट अपहरण करण्यात आले होते.” राठी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 10 ऑक्टोबरच्या सकाळी घडलेल्या या संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती दिली आहे. या कठीण प्रसंगात ज्या लोकांसोबत उभे राहिले आणि पाठिंबा दर्शवला, त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

बेडरूममधून ओढत नेल्याचा आणि वकिलाशी संपर्क न करू दिल्याचा आरोप

व्हिडिओमध्ये घटनेचा घटनाक्रम सांगताना ध्रुव राठी म्हणाले की, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ते झोपलेले असताना जवळपास 20 लोकांचे पथक त्यांच्या गुरुग्राममधील घरात बळप्रकरणी घुसले. साध्या वेशातील या लोकांनी थेट त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला, त्यांना ओढत घराबाहेर काढले आणि एका वाहनात बसवून सोबत घेऊन गेले.

या संपूर्ण कारवाईदरम्यान त्यांना कोणतीही कायदेशीर कागदपत्रे दाखवली गेली नाहीत किंवा या कारवाईचे कारणही समजावून सांगितले गेले नाही. इतकेच नव्हे तर, वकिलाशी संपर्क साधण्याची किंवा कायदेशीर मदत घेण्याची साधी संधीही त्यांना दिली गेली नाही. त्यांच्या पालकांचे फोन तात्काळ काढून घेण्यात आले आणि त्यांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी फोन वापरण्यास किंवा कोणालाही भेटण्यास सक्त मनाई करण्यात आली. या धक्काबुक्कीमध्ये आपल्याला शारीरिक दुखापत झाल्याचा दावाही राठी यांनी केला असून, चपला न घालताच आपल्याला जबरदस्तीने खाली नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राठी यांनी केलेले हे सर्व आरोप त्यांच्या वैयक्तिक व्हिडिओवर आधारित असून, प्रशासनाकडून या घटनाक्रमाची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा – तब्बल 24 तासांनंतर CJP च्या तिनही नेत्यांची अखेर सुटका; ‘पुन्हा आंदोलन करणार नाही’, या हमीपत्रावर घेतली स्वाक्षरी

भारतीय नागरिकत्वाचा दावा आणि नजरकैदेचे आरोप

आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना व्हिडिओमध्ये ध्रुव राठी यांनी आपला पासपोर्ट कॅमेऱ्यासमोर दाखवला आणि आपण एक भारतीय नागरिक असल्याचा जोरदार दावा केला. आपल्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या सर्व अफवा त्यांनी फेटाळून लावल्या. इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच आपल्यालाही संविधानाने दिलेले सर्व हक्क आणि अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुटकेनंतरही आपल्या राहत्या घराबाहेर साध्या वेशातील पोलिसांचा पहारा असून आपल्या हालचालींवर सतत पाळत ठेवली जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या परिस्थितीचे वर्णन त्यांनी ‘अनधिकृत नजरकैद’ असे केले. लोकशाही मूल्यांवर आणि स्वातंत्र्यावर हा थेट हल्ला असून देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा दावा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केला. जंतर-मंतरवरील आंदोलनाआधी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version