Amit Thackeray On Musical Road: मुंबईच्या कोस्टल रोडवर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘म्युझिकल रोड’वरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर आणि स्वरूपावर तीव्र आक्षेप घेत राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “मुंबईकर प्रदूषण आणि वाहतूक कोंडीने त्रस्त असताना अशा ‘शो-बाजी’वर कोट्यवधींची उधळण कशासाठी?” असा थेट सवाल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.
काय आहे हा ‘म्युझिकल रोड’ आणि तंत्रज्ञान?
मुंबई महानगरपालिकेने नरिमन पॉइंट ते वरळी दरम्यानच्या 500 मीटर पट्ट्यात हा अनोखा प्रयोग केला आहे. जपान आणि हंगेरीच्या धर्तीवर साकारलेल्या या ‘मेलोडी रोड’वर विशेष ‘रंबल स्ट्रिप्स’ तयार करण्यात आल्या आहेत. जेव्हा एखादे वाहन या रस्त्यावरून 60 ते 80 किमी प्रतितास या विहित वेगाने जाते, तेव्हा टायरांच्या घर्षणामुळे ‘जय हो’ या गाण्याचे संगीत निर्माण होते. या संपूर्ण प्रयोगासाठी पालिकेने सुमारे 6.5 कोटी रुपये खर्च केले आहेत.
मराठी मातीचा विसर पडला का?
अमित ठाकरे यांनी प्रामुख्याने गाण्याच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. “हा रस्ता महाराष्ट्रात आणि मुंबईत आहे, मग इथे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखे राज्यगीत किंवा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातील एखादे मराठी गाणे का निवडले नाही?” असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला. प्रत्येक वेळी मराठी अस्मितेची आठवण मनसेलाच का करून द्यावी लागते, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सुरक्षा की विरंगुळा? प्रवाशांच्या मनस्थितीचा विचार
कोस्टल रोडचा वापर हा प्रामुख्याने वेळेची बचत आणि शांत प्रवासासाठी केला जातो. मात्र, तिथे अशा प्रकारचे संगीत म्हणजे रोजच्या प्रवाशांसाठी ‘गोंगाट’ ठरणार नाही का? असा मुद्दा अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, अचानक ऐकू येणाऱ्या संगीतामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढू शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
विकास आणि संस्कृतीचे भान राखण्याचा सल्ला
“विकास व्हायलाच हवा, पण आपली संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखला जात नसेल तर तो विकास अपूर्ण आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. प्रशासनाने प्रयोग जरूर करावेत, पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे, याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.