Nitin Gadkari: निवडणुकीत मते मिळवण्यासाठी कोणालाही फुकटची दारू पाजू नका. मतदारांना खाऊ-पिऊ घाला, पण व्यसनांच्या आहारी नेऊ नका. भाडोत्री लोकांच्या जोरावर नाही, तर केलेल्या विकासकामांच्या बळावर जनतेचा विश्वास जिंका, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाल येथील चिटणीस पार्क मैदानावर आयोजित ‘युवा मोर्चा’च्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे अनेक आमदार आणि शहराध्यक्ष उपस्थित होते.
नाग नदीतून ‘बोट’ चालवूनच दाखवणार; टीकाकारांना प्रत्युत्तर
आपल्या स्वप्नवत प्रकल्पांवर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, काही लोकांनी माझ्या नाग नदीतून नाव चालवण्याच्या कल्पनेची थट्टा केली. मात्र, मी हे करूनच दाखवणार. अंबाझरी ते अंभोऱ्यापर्यंतचा प्रवास नावेतून करता येईल, अशी सुंदर नाग नदी आम्ही साकारत आहोत. नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 2400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नागपूरचा कायापालट
शहरातील पायाभूत सुविधांचा पाढा वाचताना गडकरींनी सांगितले की, नागपूरची पाणी समस्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. गोळीबार चौकातील पूल हटवून तिथे अंडरपास तयार केला. पारडी आणि कामठी मार्गावरील पुलांसह रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी ‘फोर-लेयर’ (चारस्तरीय) व्यवस्था निर्माण केली आहे.
तिकीट वाटपावर स्पष्ट भाष्य
महानगरपालिकेसाठी सुमारे 5 हजार इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याचे सांगताना गडकरींनी कार्यकर्त्यांना वास्तव मांडले. तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी एका जागेवर एकच उमेदवार बसू शकतो. ज्याला खऱ्या अर्थाने जनसमर्थन आहे, त्यालाच संधी मिळेल. एकदा उमेदवार ठरला की, मतभेद विसरून सर्वांनी भाजपचा महापौर बसवण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
उत्तर आणि पश्चिम नागपूरवर विशेष लक्ष
लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपुरात अपेक्षित मते न मिळाल्याची प्रांजळ कबुली गडकरींनी दिली. मी कुणालाही दोष देत नाही, कदाचित आम्ही लोकांचा विश्वास जिंकण्यात कमी पडलो. पण यंदा उत्तर नागपुरातून 16 ते 18 आणि पश्चिम नागपुरातून किमान 15 ते 20 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवा, असे लक्ष्य त्यांनी युवा आघाडीला दिले.