BMC Election 2026: जागावाटपावरून ‘मातोश्री’ अन् ‘शिवतीर्थ’मध्ये खलबतं; राज ठाकरेंनी राऊत-परबांना थेट काय सांगितलं?

नगरपरिषद निवडणुकांतील अपयशानंतर मुंबई महापालिका निवडणूक 2026 शिवसेना (ठाकरे गट)आणि मनसेसाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.

BMC Election 2026: जागावाटपावरून ‘मातोश्री’ अन् ‘शिवतीर्थ’मध्ये खलबतं; राज ठाकरेंनी राऊत-परबांना थेट काय सांगितलं?

मुंबई: राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेतृत्वाने या निवडणुकांकडे काहीसे दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम निकालावर दिसून आला.

मात्र, आता राज्यातील आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी अतिशय निर्णायक ठरणार आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची (BMC Election 2026) निवडणूक ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. याच कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये युती आणि जागावाटपाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे.

हेही वाचा: Domestic Stock Market: शेअर बाजारात 'पैशांचा पाऊस'! चालू वर्षात 'हे' क्षेत्र ठरले सर्वाधिक पॉवरफुल; पाहा NSE चा रिपोर्ट

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. असे असतानाही, मनसे आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मराठी मतदारांचे वर्चस्व असलेल्या दादर, माहीम, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी यांसारख्या विभागांमधील प्रभागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते आग्रही असल्याने चर्चेचे गुऱ्हाळ लांबत चालले आहे.

जागावाटपाला होत असलेला हा विलंब उमेदवारांच्या प्रचारावर परिणाम करू शकतो, ही भीती ओळखून राज ठाकरे यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना आणि स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, "जागावाटपाची चर्चा आता फार लांबवू नका; जिथे मुद्दे अडले आहेत तिथे सामंजस्याने मार्ग काढा."

या पार्श्वभूमीवर, मनसे नेते आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अनिल परब यांच्यात दैनिक 'सामना'च्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वादग्रस्त प्रभागांबाबत थेट चर्चा करण्यात आली असून, त्याचा अहवाल राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता या दोन भावांमधील चर्चेतून मुंबईच्या जागावाटपाचा 'निकाला' कसा लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, भाजपने या गोंधळाचा फायदा घेत आपला प्रचार सुसाट सुरू केला आहे. "उमेदवारांची वाट पाहू नका, घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार करा," अशा कडक सूचना भाजप नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्यांनी मुंबईत प्रचाराचे जाळे विणण्यास सुरुवात केल्याने, मनसे-ठाकरे युतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

एकूणच, मुंबई महानगरपालिकेची ही आगामी निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना, राज ठाकरे यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका युतीचा मार्ग सुकर करणार की जागावाटपाचा हा पेच आणखी लांबणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे, भाजपने प्रत्यक्ष प्रचारात घेतलेली आघाडी पाहता, मनसे आणि ठाकरे गटाला आता अंतर्गत मतभेद बाजूला सारून तातडीने मैदानात उतरावे लागणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: सावधान! केवळ थंडीच नाही, तर 'हा' धोकाही वाढला; हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number