‘मी शिंदेंची शिवसेना सोडणार…’; गजानन कीर्तिकरांनी ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण

गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गट सोडून उद्धव ठाकरे गटात परतण्याच्या चर्चांना निराधार ठरवले आहे.
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikar

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गजानन कीर्तिकर यांच्या नाराजीच्या चर्चांनी वातावरण तापले असतानाच त्यांनी स्वतः पुढे येत या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोडणार नसून, ठाकरे गटात परतण्याचाही कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याबाबत प्रसारित झालेल्या बातम्या निराधार असल्याचे सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आहेत. त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात सक्रिय आहेत. त्यामुळे गजानन कीर्तिकर पुन्हा ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, या चर्चांमुळे आपल्यालाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास

आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने काम करत आहोत. शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा कोणताही इरादा नाही, असे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. शिवसेना सध्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढत असल्याने आणि पक्षाचा हिंदुत्वाचा विचार मागे पडत असल्याने आपण शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाराजी नेमकी कशाबाबत?

दरम्यान, कीर्तिकर यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी काही प्रसंगी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याची बाब मान्य केली. माजी खासदार म्हणून अन्यायग्रस्त नागरिकांची कामे करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असणे आवश्यक आहे. मात्र, महत्त्वाच्या किंवा कठीण प्रसंगी संपर्क होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. संपर्कातील अडचणी दूर करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियमित बैठका व्हाव्यात, अशी सूचनाही आपण केल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम?

गजानन कीर्तिकर यांच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चांना तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. पक्षप्रमुखांशी संपर्काचा मुद्दा हा संघटनात्मक कामांशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वास कायम असल्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version