Gokul Dudh Sangh election: कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) ची पंचवार्षिक निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचा दावा केला जात असला, तरी अधिकृत घोषणेला मोठा ब्रेक लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला 9 जागा, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 7-7 जागा, तर जनसुराज्य शक्ती पक्षाला 2 जागा असे एकूण 21 जागांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष घोषणा मात्र थांबवण्यात आली आहे.
आमदार यड्रावकर गटाचा समावेश अन् मुश्रीफांचा बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार
या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या 9 जागांपैकी 1 जागा ही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाला देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि यड्रावकर समर्थकांकडे ठरावधारकांचे संख्याबळ जास्त असतानाही केवळ 8 जागा राष्ट्रवादीला मिळण्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ तीव्र नाराज असल्याचे समजते. मुश्रीफ यांनी सुरुवातीपासूनच किमान 10 जागांची मागणी लावून धरली होती. या नाराजीतून त्यांनी महायुतीच्या पॅनलमध्ये थेट सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा दिल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढणार? ‘गर्जना मोर्चा’वर पोलिसांची कडक नजर; आयोजकांवर FIR दाखल होण्याची शक्यता
गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेला तिढा कायम
गोकुळ निवडणुकीतील सत्तासंघर्षाबाबत गेल्या 6 महिन्यांपासून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चांच्या फेऱ्या सुरू होत्या. यापूर्वी झालेल्या 2 प्रमुख बैठकींनंतरही कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. अखेर ठरावांच्या संख्याबळाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षीय पातळीवरील या वाटपामुळे अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. हसन मुश्रीफ यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असून, येत्या 2 दिवसांत ते आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे महायुती ही निवडणूक एकदिलाने लढणार की जागावाटपावरून नवा ट्विस्ट येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.