महायुतीचा गोकुळ निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला 9, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी ‘इतक्या’ जागा

महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला.
महायुतीचा गोकुळ निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला 9, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी ‘इतक्या’ जागा
Gokul Milk Union election

Gokul Milk Union Election: कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक व राजकीय शक्तिपीठ असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जागावाटपाचा तिढा यशस्वीपणे सोडवला आहे. बुधवारी पार पडलेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. या सूत्रांनुसार महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा, शिवसेना (शिंदे गट) व भाजपला प्रत्येकी 7 जागा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 2 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत,” असे स्पष्ट करत चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील अंतर्गत समन्वयावर भर दिला.

11 ऑक्टोबर रोजी प्रचाराचा नारळ फुटणार

दरम्यान, जागावाटपाची रचना निश्चित झाली असली तरी कोणत्या पक्षाला कोणती जागा सुटणार, यावर नेत्यांची चर्चा सुरू आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या संपूर्ण पॅनेलची आणि उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी महायुतीचा मोठा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यातून गोकुळ निवडणुकीच्या प्रचाराचा प्रत्यक्ष शुभारंभ केला जाईल. या पत्रकार परिषदेस मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधकांचा भाजपवर संस्था ताब्यात घेण्याचा आरोप

दुसरीकडे, उमेदवारी न मिळणाऱ्या इच्छुकांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करत असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. महायुतीतून संधी न मिळालेले काही नाराज इच्छुक काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’च्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे महायुतीसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा – ‘मी दादांसारखी मोठ्या मनाची नाही, एकदा पक्षातून बाहेर पडलेल्याला पुन्हा…’; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना थेट इशारा

या घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. भाजपला राज्यातील सर्वच सहकार संस्था स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या आहेत आणि गोकुळच्या बाबतीतही हाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे आगामी काळात गोकुळची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version