Wednesday, June 18, 2025 03:29:05 PM

'समृद्धी महामार्ग प्रकल्पात 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार'; हर्षवर्धन सपकाळचे आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. अशातच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सपकाळ यांनी महायुती सरकारवर घणाघात टीका केली आहे.

समृद्धी महामार्ग प्रकल्पात 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार हर्षवर्धन सपकाळचे आव्हान

शुभम उमले. प्रतिनिधी. मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. यादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते. अशातच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर घणाघात टीका केली आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. 'देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचा कारण ठरला आहे. तसेच, 55 हजार कोटींचा समृद्धी महामार्ग 70 हजार कोटींचा कसा झाला?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर घणाघात टीका केली आहे. 'देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचा कारण ठरला आहे. तसेच, 55 हजार कोटींचा समृद्धी महामार्ग 70 हजार कोटींचा कसा झाला?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे सपकाळ म्हणाले की, 'प्रकल्पाचा खर्च 15 हजार कोटी रुपयांनी वाढवल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी'. 

हेही वाचा: 'महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग'; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, 'घोडबंदर-भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पात 3 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. सुप्रीम कोर्टाचा हातोडा पडल्याने नाईलाजास्तव ह्या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले. घोडबंदर-भाईंदर प्रकल्पाप्रमाणेच समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी यातून मोठा मलिदा खाल्ला आहे. समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच '50 खोके एकदम ओके'चा कार्यक्रम झाला. समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. या महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकऱ्यांना भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरु आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा'.

हेही वाचा: 'युतीबाबत दोन्ही भावांनी फोनवरून चर्चा करावी'; पुतण्याचा काकांना सल्ला

समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक भागात तडे गेले आहेत. महामार्ग सुरु झाल्यापासून विविध अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर शेकडो जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्ग हा फक्त सत्ताधारी पक्षातील मोजक्या लोकांची समृद्धी करणारा प्रकल्प ठरला आहे. यात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली पाहिजे', असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


सम्बन्धित सामग्री