Rupali Chakankar: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सातत्याने होणाऱ्या चिखलफेकीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर अत्यंत आक्रमक शब्दांत मौन सोडले आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या आरोपांविरोधात आता आपण कायद्याच्या चौकटीत राहून निर्णायक लढा सुरू केला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याप्रकरणी त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत धाव घेत बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटिसा धाडल्या आहेत.
'खरात यांच्या वादग्रस्त व्यवहारांशी माझा तिळमात्र संबंध नाही'
सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडताना चाकणकर यांनी स्पष्ट केले की, खरात यांच्या कोणत्याही आर्थिक उलाढाली, जमिनीचे व्यवहार किंवा इतर कोणत्याही आक्षेपार्ह बाबींशी आपला दूरान्वयानेही संबंध नाही. तसेच आपण कोणत्याही महिलेला त्यांच्याकडे नेले नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्यावर आणि कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, व्हायरल झालेला पाद्यपूजेचा व्हिडिओ जुना असून, त्यावेळी आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरही नव्हतो, असेही त्यांनी नमूद केले.
'राजीनामा निष्पक्ष तपासासाठीच'
"या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे पारदर्शक व्हावी म्हणूनच मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तरीही एआय (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले," असा खळबळजनक आरोप चाकणकर यांनी केला आहे.
आशा मिरगे यांना न्यायालयाचे समन्स
दरम्यान, या वादात माजी महिला आयोग सदस्या आशा मिरगे यांच्याविरोधात चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. एका चर्चासत्रातील वक्तव्यानंतर पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास मिरगे यांनी टाळाटाळ केल्यामुळे, चाकणकर यांनी अखेर माझगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. यावर न्यायालयाने गंभीर दखल घेत आशा मिरगे यांना 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्या दिवशी आपण स्वतः न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
'हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा'
केवळ आशा मिरगेच नव्हे, तर विनापुराव्यांचे आरोप करणाऱ्या इतर काही महिलांनाही दिल्ली उच्च न्यायालयामार्फत कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. "हा लढा केवळ माझा वैयक्तिक नसून, कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर आणि सन्मानावर विनाकारण शिंतोडे उडवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधातील न्यायाचा लढा आहे," अशा शब्दांत चाकणकर यांनी आपला निर्धार व्यक्त केला आहे.