छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकीचा फोन आल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘पाच लाखांत तुमची सुपारी घेतली आहे, दहा लाख रुपये द्या, अन्यथा काम करावे लागेल,’ अशा शब्दांत धमकी दिल्याचे जंजाळ यांनी सांगितले.
या प्रकरणी तक्रार देण्यासाठी ते पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, पुरावे सादर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले.
घटनेची माहिती मिळताच शेकडो शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत तातडीने गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कारवाई होईपर्यंत ठाण्याबाहेरून हटणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. राजेंद्र जंजाळ यांच्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.