राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना धमकावल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. या घटनेची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून दिली. आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने त्यांना वारंवार फोन केला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच, आपण त्यांच्या घराच्या बाहेर उभे असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलिसांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी धमकीसंदर्भातील व्हॉट्सॲप संदेशही सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती आहे. दरम्यान, आव्हाड यांना धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे आणि या प्रकारामागील कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित व्यक्तीची ओळख पटवून धमकीची सत्यता तपासणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.