मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत असून, त्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तेच्या जोरावर सरकार 'बेभान' झाल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीने सरकारच्या अधिकृत चहापानावर बहिष्कार टाकला आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीवरून चर्चा
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, आमदार भास्कर जाधव यांनी ही परिस्थिती सावरून धरली. "आम्ही सर्वजण एकजूट आहोत. केवळ संवादामध्ये थोडा 'गॅप' झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना पोहोचायला उशीर झाला आहे, ते काही वेळातच येथे येतील," असे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले.
'लाडकी बहीण' आणि शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर निशाणा
विरोधकांनी यावेळी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. भास्कर जाधव म्हणाले की, "सरकारने प्रचंड बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम सुरू केले आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसरीकडे 'लाडकी बहीण' योजनेवरून सरकार राजकारण करत आहे. बहिणींना पैसे देऊन त्यांची मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला आणि आता या योजनेमुळेच राज्य कर्जबाजारी झाल्याचा बनाव रचला जात आहे. प्रत्यक्षात लाडक्या बहिणींमुळे नाही, तर सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे."
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरवरही भाष्य
नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. नागपुरात नक्की काय सुरू आहे, हे सर्वांना दिसत असून भ्रष्ट कारभाराने राज्याचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अमेरिकेसोबत झालेल्या काही करारांमुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून सरकारचे धोरण पूर्णपणे 'शेतकरी विरोधी' असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
विरोधकांचा आक्रमक पवित्रा
शेतकऱ्यांना एक रुपयाचाही पीक विमा मिळालेला नाही आणि दादांच्या (दिवंगत अजित पवार) अपघाताबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित करत विरोधकांनी अधिवेशनापूर्वीच सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे.
एकूणच, उद्यापासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळत असून, विरोधकांनी चहापानावर टाकलेला बहिष्कार ही केवळ संघर्षाची सुरुवात मानली जात आहे.