Sunday, February 15, 2026 06:52:27 AM

Dhule Municipal Corporation Results 2026 : निकालाआधीच खान्देशातील वातावरण तापलं, धुळे महानगरपालिकेत कोण मारणार बाजी?

सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून भाजपला आधीच 4 बिनविरोध जागा मिळाल्या आहेत. दुपारपर्यंत सत्तेचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

dhule municipal corporation results 2026  निकालाआधीच खान्देशातील वातावरण तापलं धुळे महानगरपालिकेत कोण मारणार बाजी

धुळे: खान्देशातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या धुळे महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान कोण चढणार, याचा फैसला आज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहरात जो प्रचाराचा धुरळा उडाला होता, तो आता शांत झाला असून सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शहराचा नवा ‘कारभारी’ कोण? याचे चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.

निकालाआधीच भाजपचे ‘कमळ’ फुलले

धुळे महानगरपालिकेत यंदा एकूण 74 जागांसाठी रणसंग्राम होता. मात्र, चुरस प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच कमी झाली, जेव्हा भाजपने चार जागांवर बिनविरोध विजय मिळवत आपला ‘चौकार’ ठोकला. प्रभाग क्र. 1 ‘अ’ मधून उज्वला भोसले, प्रभाग 6 ‘ब’ मधून ज्योत्सना पाटील आणि प्रभाग 17 ‘अ’ व ‘ब’ मधून अनुक्रमे अमोल मासुळे व सुरेखा उगले यांनी विजयाची गुलाल उधळली आहे. यामुळे आता उर्वरित 70 जागांसाठी 316 उमेदवारांचे भवितव्य आज पेटीतून बाहेर पडणार आहे.

मतमोजणीची जय्यत तयारी: सहा कक्षांत रणधुमाळी

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने यासाठी सहा कक्ष तैनात केले असून, एकाच वेळी सर्व फेऱ्यांची गणती होणार आहे. मतमोजणीची सुरुवात नियमानुसार सर्वात आधी टपाली मतांनी (Postal Ballots) होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांच्या फेऱ्यांना सुरुवात होईल. अंदाजे 10 ते 14 फेऱ्यांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

हेही वाचा: Pune Election Results 2026: ईव्हीएम उघडणार, भविष्य ठरणार; पुण्यात विजयाचा टिळा कोणाच्या कपाळी? आज निकालाचा 'सुपर फ्रायडे'

तीन टप्प्यांत विजयाचा मार्ग

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया ही तीन टप्प्यांत विभागली गेली आहे. प्रत्येक टप्प्यानंतर अधिकृत आकड्यांची घोषणा केली जाईल. शहराच्या संवेदनशील भागातील प्रभाग आणि प्रतिष्ठेच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. “दुध का दुध आणि पाणी का पाणी” आज होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि धाकधूक पाहायला मिळत आहे. प्रत्येक फेरीत उमेदवारांच्या मतांची आघाडी आणि पिछाडीवर शहरातील गप्पांचे फड रंगणार आहेत.

उमेदवारांची धाकधूक आणि शहरात कडक बंदोबस्त

316 उमेदवारांच्या नशिबाचा कौल आज स्पष्ट होणार असल्याने धुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. केंद्राच्या 500 मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, केवळ अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जात आहे.

धुळेकरांनी यंदा विकासाला साथ दिली आहे की जुन्याच समीकरणांवर भर दिला आहे, हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. भाजपला आधीच मिळालेल्या चार जागांमुळे त्यांच्यासाठी हा रस्ता काहीसा सुकर झाला असला, तरी महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार कोणाचे समीकरण बिघडवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: Solapur Civic Body Election Results 2026: एक्झिट पोलने वाढवली धडधड! सोलापुरात भाजप बहुमताच्या जवळ, पण काँग्रेसचे गणित काय?


सम्बन्धित सामग्री