Maharashtra Vidhan Parishad BJP Single Largest Party : महाराष्ट्र विधान परिषदेत आता भारतीय जनता पक्षाचा (BJP) हुकुमी एक्का पाहायला मिळणार असून पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे. वरिष्ठ सभागृहाची एकूण क्षमता 78 जागांची असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर सध्या सभागृहात 73 आमदार कार्यरत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या 73 आमदारांपैकी एकट्या भाजपचे तब्बल 35 आमदार आहेत. यामुळे भाजप विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष (Single Largest Party) ठरला असून, आता पक्षाला सभागृहात कोणतेही महत्त्वाचे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मित्रपक्षांवर विसंबून राहावे लागणार नाही. एका खास राजकीय खेळीमुळे भाजपचे हे संख्याबळ आगामी काळात आणखी मजबूत होणार आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या खेळीने आकडा बदलणार
सभागृहातील एकूण संख्याबळाचे गणित पाहिले तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जणांची नियुक्ती यापूर्वीच झाली असून 5 जागा अजूनही रिक्त आहेत. या उर्वरित 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे, तर उर्वरित प्रत्येकी 1 जागा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळू शकते. भाजपचे सध्याचे 35 आमदार आणि हे संभाव्य 3 नवीन आमदार एकत्र आल्यास भाजपचा आकडा थेट 38 वर पोहोचेल. यामुळे विधान परिषदेत भाजप पूर्णपणे बहुमताच्या काठावर किंवा त्याहून पुढे जाण्यास सज्ज झाला आहे.
संख्याबळ 40 पार नेण्याची नवी संधी
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांच्या निवडणुका भाजपसाठी जुने हिशेब चुकते करण्याची मोठी संधी मानली जात आहे. या 5 मतदारसंघांतील निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार कामगिरी केल्यास त्यांचे संख्याबळ आणखी वाढू शकते. जर यातील किमान 3 जागा जरी भाजपच्या पारड्यात पडल्या, तर विधान परिषदेतील भाजप आमदारांची संख्या थेट 40 किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला वरिष्ठ सभागृहात एकहाती पाशवी बहुमत मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा – Sana Malik: सना मलिक विधानसभेत आक्रमक, तिहेरी तलाकचा मुद्दा पेटला; नेमकं काय घडलं?
सध्याचे पक्षनिहाय संख्याबळ खालीलप्रमाणे आहे:
भाजप – 35
शिंदे सेना – 12
राष्ट्रवादी अजित पवार – 10
ठाकरे गट – 6
काँग्रेस – 5
राष्ट्रवादी (शरद पवार) – 2
अपक्ष – 3
विरोधी पक्षनेतेपदाचा पेच आणि विरोधकांची नाराजी
दुसरीकडे, पुरेशा संख्याबळाअभावी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिक्तच राहिले आहे. या मानाच्या पदासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच सुरू असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे जागा भरण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी परंपरेनुसार सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कारादरम्यान विरोधी नेत्यांनी सरकारकडून विरोधी पक्षनेतेपद जाणीवपूर्वक रिक्त ठेवले जात असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.