महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतिक्षा तब्बल चार वर्षांपासून होती, आणि अखेर त्या प्रक्रियेला वेग मिळू लागला आहे. पहिल्या टप्प्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा स्वीकार कार्यक्रम सोमवारी पार पडला असून, या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीही वातावरण तापू लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील दोन दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक निवडणुका तीन टप्प्यात; दुसऱ्या टप्प्याची मोठी प्रतीक्षा राज्यातील तीनही टप्प्यांच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत.
पहिला टप्पा: 288 नगरपालिका, नगरपंचायती (मतदान दिनांक 2 डिसेंबर), दुसरा टप्पा: जिल्हा परिषद व पंचायत समिती (घोषणा 2 दिवसांत), तिसरा टप्पा: राज्यातील सर्व महापालिका निवडणुका (जानेवारीत अपेक्षित) दुसऱ्या टप्प्याची घोषणा जवळ आली असल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे झाले आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लवकरच अधिसूचना निघणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघेही रणनीती आखण्यात गुंतले आहेत.
हिवाळी अधिवेशन आणि निवडणुका
या अगोदर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 20 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका 20 डिसेंबर नंतर होतील, असे बोलले जात होते. मात्र आता हे गणित बदलत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नक्कीच 20 ते 25 दिवसांत म्हणजेच डिसेंबरच्या मध्यावर किंवा तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते. त्यामुळे हिवाळी अधिवेशन 22 ते 30 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे घेण्याची शक्यता वाढली आहे.
प्रशासनिक यंत्रणा सज्ज
नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होताच राज्य प्रशासनाने तयारीला गती दिली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार असल्याने शासकीय यंत्रणा पूर्णपणे तैनात झाली आहे. तर महापालिका निवडणुका जानेवारीत पूर्ण करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे संकेत मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सलग होत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून प्रत्येक पक्षासाठी ही परीक्षा ठरणार आहे.