Maharashtra elections: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणा नुकत्याच जाहीर झाल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर एका मोठ्या शहराच्या नामांतराचा निर्णय अंतिम करण्यात आला आहे. दोन डिसेंबरला 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे, तर निकाल 3 डिसेंबरला लागू होणार आहेत. निवडणुकांपूर्वी आचारसंहिता लागू झाली असली तरी या आचारसंहितेच्या काही तास आधीच महत्त्वपूर्ण जीआर राज्य सरकारकडून काढण्यात आला. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ‘इश्वरपूर’ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर नगरपरिषदेचं नावदेखील अधिकृतरीत्या इश्वरपूर नगरपरिषद असं लिहिलं जाणार आहे.
हा निर्णय अचानक झाला नाही. यामागे अनेक दशकांचा राजकीय, वैचारिक आणि भावनिक इतिहास आहे. राज्य सरकारने याबाबतचा दस्तऐवज आणि प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. मंत्रालयाच्या विभागीय तपासण्या आणि प्रक्रियेनंतर हा प्रस्ताव भारताच्या सर्वेक्षण विभागाकडे पाठवण्यात आला. त्या स्तरावरची संमती मिळाल्यानंतर अखेर या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असं सांगण्यात येत आहे. या संदर्भात राज्य शासनाने अधिकृत GR काढून स्थानिक प्रशासनाला अद्ययावत बदल लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा: Raj Thackeray On EC : निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले; म्हणाले, 'हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं...'
या नामांतराच्या मागणीला तशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंत सबनीस यांनी 1970 च्या दशकात सर्वप्रथम या विषयावर आवाज उठवला होता. त्यानंतर उभ्या महाराष्ट्रासमोर या मागणीला राजकीय वजन 1986 साली मिळालं. प्रसिद्ध यल्लमा चौकातल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी 'हे इस्लामपूर नाही, हे इश्वरपूर' अशी भुमिका मांडत जोरदार घोषणा केली होती. म्हणूनच या निर्णयानंतर 'चार दशकांपूर्वीची भूमिका अखेर मंजूर' अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत.
यापूर्वीही राज्यातील मोठ्या शहरांच्या नामांतरणाचे निर्णय झाले आहेत. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशीव’ आणि अहमदनगरचं 'अहिल्यानगर' असं नामांकन पूर्ण झालं आहे. त्यापुढे जाऊन काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या नावातही बदल करून ते 'अहिल्यानगर' स्टेशन म्हणून जाहीर केले आहे.
हेही वाचा: EC On Maharashtra Election 2025 : महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर!; 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
आता इस्लामपूरच्या नामांतरास केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर स्थानिक राजकारण, मतदारांचे मूड, निवडणूकभूगोल अशा सर्व घटकांमध्ये एक नवा संवाद सुरू झाला आहे. कारण हा निर्णय जाहीर होण्याची टायमिंग लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली आणि लगेचच काही तासांतच नामांतराचा जीआर झाल्याने चर्चा अधिक वाढली. त्यामुळे आता या निर्णयाचा निवडणुकीतील चित्रावर काही परिणाम होतो का? स्थानिकांना कोणती भावना निर्माण होते? याकडेही राजकीय विश्लेषक लक्ष ठेवून आहेत.