मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. हा राजीनामा सध्या राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. या निर्णयामुळे मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासकीय सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याच्या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल सत्र न्यायालयानेही कायम ठेवल्याने त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून त्यांची अटक कोणत्याही क्षणी होऊ शकते. सध्या ते मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा: Bharat Taxi चा चालकांना फायदा, Ola-Uber प्रमाणे कमिशन द्यावे लागणार नाही आणि…
अटक वॉरंटनंतर कोकाटे राजीनामा देणार की नाही, यावरून दिवसभर राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण होते. सुरुवातीला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली, तर नंतर त्यांनी राजीनामा दिला नसल्याच्या चर्चांनाही उधाण आले. मात्र आता हा संभ्रम संपला असून कोकाटे यांनी प्रत्यक्षात मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सदनिका प्रकरण त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी निर्णायक ठरत असून न्यायालयाकडून त्यांना कोणतीही तातडीची दिलासा मिळालेला नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचे खाते काढून घेण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती, ती राज्यपालांनी मान्य केली आहे. परिणामी कोकाटे यांनी राजीनामा दिल आहे. रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी तात्पुरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारली आहे. काही काळ हे खाते त्यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून केवळ खाते बदल नव्हे, तर मंत्रिपदाचा राजीनामाही घ्यावा अशी ठाम मागणी होत होती.अटक वॉरंट आणि न्यायालयीन निकालांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांचे राजकीय भविष्य सध्या मोठ्या संकटात सापडले आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत असून, कोकाटे प्रकरणाचा पडसाद आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंना जाणवणार आहेत. न्यायालयीन प्रक्रिया, अटक वॉरंट आणि मंत्रिमंडळातील फेरबदल यांच्या पार्श्वभूमीवर पुढील निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, येणारे काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.