‘जो नेता मराठ्यांच्या विरोधात, त्याला 2029 ला…’; नारायण गडावरून मनोज जरांगे पाटलांची निवडणुकांबाबत आक्रमक भूमिका

या मेळाव्यात त्यांनी आरक्षणाचा मुद्दा, राज्याची भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले.
‘जो नेता मराठ्यांच्या विरोधात, त्याला 2029 ला…’; नारायण गडावरून मनोज जरांगे पाटलांची निवडणुकांबाबत आक्रमक भूमिका
Manoj Jarange Patil speech

मराठा समाजासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर बीडमधील प्रसिद्ध नारायण गडावरून मराठा बांधवांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यात त्यांनी आरक्षणाचा मुद्दा, राज्याची भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले. आतापर्यंत नेत्यांच्या मागे धावून केवळ त्यांना मोठे करण्याचे दिवस संपले आहेत, अशी परखड भूमिका मांडत त्यांनी समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव नारायण गडावर उपस्थित राहिल्याने मोठा जनसागर पाहायला मिळाला.

जरांगे पाटलांचा एल्गार

भाषणादरम्यान बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “मी अत्यंत प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत आहे, पण काही लोकांना मी त्यांच्या विरोधात बोलतो असे वाटते. मात्र, मी माझ्या समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही. जो नेता किंवा पक्ष मराठा आरक्षणाच्या आणि समाजाच्या विरोधात जाईल, त्याला 2029 च्या विधानसभा निवडणुकीत अजिबात विजयी होऊ द्यायचे नाही.” आतापर्यंत जे आपल्याविरोधातील भूमिकेत वागले, त्यांना समाजाने निवडणुकीत धडा शिकवला आहे, असे सांगत त्यांनी समाजाला राजकीयदृष्ट्या अधिक सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

मराठा समाजातील ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, परंतु अद्याप अधिकृत प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या मदतीसाठी लवकरच एक विशेष फोन नंबर जाहीर केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.

हेही वाचा – ‘देश जाळणारी तरुण पिढी आपल्या देशात नको…’; भगवान गडावरून पंकजा मुंडे यांचे तरुण पिढीबाबत मोठं वक्तव्य

प्रशासकीय पातळीवर अर्ज करूनही जर कागदपत्रे मिळत नसतील, तर मराठा सेवक म्हणून या नंबरवर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी बोलून दाखवले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उभा राहणार मोठा लढा; प्रति हेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीची मागणी

सध्या राज्यातील शेतकरी वर्ग अत्यंत संकटात असून शेतीत काहीच पिकले नाही तर शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. येत्या दोन महिन्यांत परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचा इशारा देत त्यांनी शासनाकडे शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची मागणी केली. दुष्काळी झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति हेक्टरी आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण लवकरच एक मोठा लढा उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना सक्षम केल्याशिवाय समाज खऱ्या अर्थाने मोठा होणार नाही, त्यामुळे या लढ्यात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version