Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या हायव्होल्टेज निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, आता मुख्य लढत तिरंगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात 54 पैकी 13 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने शेवटी 41 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सतीश चव्हाण रिंगणात आहेत.
भाजपचे नेते एम. के. देशमुख यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतल्याने महायुतीपुढील पेच सुटला असून सतीश चव्हाण यांच्यासाठी मार्ग सुकर झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत मात्र मतभेद कायम राहिले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह पाटील दोघांनीही माघार न घेतल्याने आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे.
33 अपक्षांचेही महायुती-आघाडीसमोर आव्हान
या हायव्होल्टेज निवडणुकीत नोंदणीकृत 5 पक्षांचे उमेदवार आणि 33 अपक्ष असे एकूण 41 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 3,26,701 नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत. यामध्ये 2,48,971 पुरुष मतदार, 77,717 महिला मतदार आणि 13 इतर मतदारांचा समावेश आहे. हा सुशिक्षित मतदारवर्ग कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीने एकसंधपणे सतीश चव्हाण यांच्या पाठीशी ताकद उभी केली असली, तरी महाविकास आघाडीतील दोन अधिकृत दावेदारांमुळे मतांचे विभाजन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
23 ऑक्टोबरला होणार मतदान
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. संपूर्ण मराठवाड्यात एकूण 842 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या प्रक्रियेसाठी 935 केंद्राध्यक्ष आणि 2,814 मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडेल. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा एमआयडीसीमधील वूडस्ट्रीम डेकार एलएलपी येथे मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी मराठवाड्याचा नवा पदवीधर लोकप्रतिनिधी कोण ठरणार याचा फैसला होईल.