मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र मतभेद समोर येत होते. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट आणि उमेदवार सतीश चव्हाण यांनी एकत्र येत आपसातील सर्व वाद मिटल्याची अधिकृत घोषणा केली. संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना पूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केल्यामुळे महायुतीमधील तणाव निवळल्याचे चित्र निर्माण झाले होते.
अब्दुल सत्तार यांच्या निर्णयाने राजकीय खळबळ
शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या उमेदवाराऐवजी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे. केवळ पाठिंबा देऊन न थांबता त्यांनी सिल्लोड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी विशेष मेळावा आणि बैठकीचे आयोजन केले.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन
सिल्लोड येथील शिवसेना भवनात पार पडलेल्या या बैठकीस परभणीचे आमदार राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना अब्दुल सत्तार यांनी उच्चशिक्षित डॉ. प्रतापसिंह पाटील हेच पदवीधरांचे आणि सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. पदवीधरांचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी डॉ. पाटील यांना पहिल्या पसंतीची मते देऊन विजयी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहनही सत्तार यांनी यावेळी केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.