‘आता आम्ही मागे हटणार नाही…’; मनसेकडून पुढच्या आठवड्यात राज्यभर तीव्र आंदोलनाची हाक

निवडणूक प्रक्रियेतील कथित घोळ आणि लोकशाहीच्या गळचेपीविरोधात मनसेचे नेते मैदानात उतरले आहेत.

‘आता आम्ही मागे हटणार नाही…’; मनसेकडून पुढच्या आठवड्यात राज्यभर तीव्र आंदोलनाची हाक

देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात विविध मुद्यांवरून आंदोलनाचे वातावरण तापले असतानाच, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित घोळ आणि लोकशाहीच्या गळचेपीविरोधात मनसेचे नेते मैदानात उतरले आहेत. “सोमवारी जागोजागी सह्यांची मोहीम राबवली जाईल आणि पुढचा संपूर्ण आठवडा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरलेली दिसेल,” असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसेच, “आम्हाला तुरुंगात टाका किंवा हवे ते करा, पण आज जर आपण आवाज उठवला नाही, तर लोकशाहीचा जेव्हा गळा घोटला जात होता तेव्हा तुम्ही कुठे होतात? असा प्रश्न आपली पुढची पिढी आपल्याला विचारेल,” अशा शब्दांत देशपांड्यांनी सरकार आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

निवडणूक आयोगाचा कारभार आणि दडपशाहीविरोधात रोष

पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आक्षेप घेतले. गेल्या काही दिवसांत एसआयआर (SIR) प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे निदर्शनास आले असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठीच हे सर्व केल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे कोणतेही आदेश दिले नसतानाही मनमानी सुरू असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला. मुंबईपुरते मर्यादित न राहता हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवले जाईल, असे स्पष्ट करत सरदेसाई म्हणाले की, “गर्जना मोर्चानंतर आमचा लढा थांबलेला नाही. सोमवारपासून सुरू होणारी सह्यांची मोहीम हा या संघर्षाचा पहिला टप्पा असेल, आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंत आम्ही काय काय पावले उचलणार हे सरकारला लवकरच दिसून येईल.”

हेही वाचा – जंतरमंतर आंदोलनाआधी मोठी कारवाई; अभिजीत दीपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं

नेत्यांच्या अटकेचा निषेध

दरम्यान, दिल्ली आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या दडपशाहीवर बोलताना संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध केला. “अभिजीत दिपके यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे? त्यांना किती दिवस डांबून ठेवणार? उद्या आमचा आवाज दाबलात, तर परवा आम्ही दुप्पट शक्तीने आवाज उठवू. आम्हाला रोज पोलीस दिसतात आणि आम्हीही पोलिसांना सामोरे जातो, त्यामुळे जे करायचंय ते करा,” असे आव्हान त्यांनी दिले. देशात सध्या निवडणुका आणि राजकीय अधिकारांवर गदा आणली जात असून, अशा प्रकारची हुकूमशाही आणि दडपशाही यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, असे मत मनसे नेत्यांनी व्यक्त केले. सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number