नागपूर खंडपीठाने कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनावर कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने आदेश दिले आहेत की, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे केले जावे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरातील शाळा, रुग्णालये आणि चारही महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून (सुओ मोटो) याचिका दाखल करून कारवाई सुरू केली.
न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि आज सायंकाळीपर्यंत आंदोलन स्थळ मोकळे केले जावे. तसेच, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी उद्या सकाळी 11 वाजता हायकोर्टात याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही आदेश देण्यात आले. दरम्यान, बच्चू कडू यांनी अद्याप आंदोलन मागे घेण्यास नकार दर्शवला आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. सरकारी पातळीवर चर्चेचे प्रयत्न सुरू असतानाच न्यायालयाचा हा आदेश आल्यानं परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.