मुंबई : भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज, सोमवारी साजरा होत आहे. पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. 46 वर्षांचा प्रवास पूर्ण करून पक्ष 47 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेखाद्वारे आपले विचार मांडले. चव्हाण म्हणाले की, एक सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, विचारधारेच्या भक्कम पायावर उभा राहिलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून घडलेला भारतीय जनता पक्ष आज एका विशाल वटवृक्षासारखा विस्तारला आहे. 6 एप्रिल 1080 रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे 25 कोटी कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून देशभर फोफावले आहे.
भाजप कार्यकर्ता, भाजयुमो उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करताना पक्षाचा इतिहास पाहिला असता, प्रत्येक कार्यकर्त्याला विचारधारेने घडवले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, समर्पित कार्यकर्त्यांनी आपल्या कष्टातून पक्ष उभा केला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नेहरू-गांधींच्या समाजवादी विचारसरणीचा प्रभाव आणि साम्यवादी चळवळींचा प्रभाव असलेल्या काळात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी जनसंघाच्या माध्यमातून वेगळा विचार मांडण्याचे धैर्य दाखवले. त्यांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
भाजपच्या प्रवासात अनेक नेत्यांचे योगदान
भाजपच्या वाटचालीत अनेक दिग्गज नेत्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रात 1980 साली उत्तमराव पाटील यांनी पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनेची पायाभरणी केली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष गावागावांत पोहोचवला आणि बहुजन-ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणले. 1995 मध्ये काँग्रेसची सत्ता उलथवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. प्रा. ना. स. फरांदे यांनी पक्षाला वैचारिक दिशा दिली, तर सूर्यभान वहाडणे पाटील यांनी शिस्तबद्ध नेतृत्वातून संघटन मजबूत केले. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकऱ्यांसाठी लढा देत पक्षाला ग्रामीण भागात रुजवले. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून संघटनेला बळकटी दिली.
सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्काचा नवा अध्याय सुरू केला. 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी झेप घेतली आणि प्रदेशाध्यक्षपदावरून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याचा विक्रम घडला. त्यानंतर रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटना आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत केला.
जातीय राजकारणाला भाजपचा प्रत्युत्तर
एकेकाळी ‘शेटजी-भटजी’ पक्ष म्हणून टीका झालेल्या भाजपने 46 वर्षांत महाराष्ट्रात 11 बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष दिले, हे जातीय राजकारण करणाऱ्यांना दिलेले ठोस उत्तर असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करताना, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मिळालेली संधी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश हे केवळ आकडे नसून जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Sunil Tatkare : 'मी शपथ घेऊन सांगतो की…'; बारामतीत सुनील तटकरेंचं मोठं विधान
‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’
भाजपचे बळ हे केवळ सभा-मेळावे नसून विचारधारेने प्रेरित कार्यकर्ते आहेत. ‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हीच पक्षाची मूलभूत भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ‘टेक-फ्रेंडली’ संघटना म्हणून स्वतःला विकसित केले असून बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधणे शक्य झाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
भारताला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे आणि महाराष्ट्राचा त्यात एक ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागाळातील समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अंत्योदय’च्या भावनेने काम केल्यास ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार होईल आणि विकसित महाराष्ट्र त्याचा महत्त्वाचा भाग ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.