पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटेना! सानप-चिवटे मैदानात; सामंत-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत हालचालींना वेग आला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटेना! सानप-चिवटे मैदानात; सामंत-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट

पुणे: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपाचा निर्णय आणि उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान इच्छुकांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेनेकडून सचिन सानप आणि मंगेश चिवटे या दोन नावांची चर्चा होत असून, दोघांच्याही हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सामंत-फडणवीस भेटीनंतर चर्चांना उधाण

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतर सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र, शिंदे नंदनवन येथे उपस्थित नसल्याने ही भेट होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घडामोडींमुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, या भेटींमध्ये नेमका कोणता निर्णय झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा: ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् वाद पेटला; जळगावमध्ये माजी सरपंचाची तरुणाला मारहाण, VIDEO व्हायरल

सानप आणि चिवटे दोघांचीही तयारी

सचिन सानप हे उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांचाच प्रतिनिधी असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली असून उमेदवारीसाठी आपण तयारी करत असल्याचे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी शिक्षक संघटनांच्या आग्रहानुसार निवडणूक लढण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाशी संबंधित आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गेल्या काही काळापासून काम केल्याचे सांगत त्यांनीही निवडणुकीसाठी तयारी केली आहे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या उमेदवारीमुळे समीकरण बदलले

दरम्यान, महायुतीतील जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर आली असून भाजपकडून कौस्तुभ गावडे यांच्या नावाची घोषणा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा एक टप्पा स्पष्ट झाला असला, तरी इच्छुकांकडून अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याने राजकीय चित्र अद्याप चर्चेत आहे.

काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

हेही वाचा: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट! अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास बंदी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश

6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज, पक्षांची अधिकृत भूमिका आणि इच्छुकांच्या निर्णयांमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number