Rahul Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी प्रचार मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली. मुजफ्फरपूर येथे झालेल्या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दांत टीका करत, त्यांच्यावर मतांसाठी 'काहीही करण्याची तयारी' असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, 'मोदींना फक्त तुमचं मत हवं आहे. जर तुम्ही त्यांना मंचावर नाचायला सांगितलं, तर ते नाचायलाही तयार होतील. ते मतांसाठी काहीही करतील.' त्यांच्या या वक्तव्याने सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, मात्र भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली.
राहुल गांधींनी पुढे चहापान आणि छठ पूजेच्या वेळी मोदींनी घेतलेल्या फोटोशूटवरही टीका केली. त्यांनी म्हटलं, 'ते लोक फक्त नाटक करतात. यमुनेचं पाणी इतकं घाण आहे की जर कोणी प्यायलं तर आजारी पडेल, पण मोदींनी तेथे कृत्रिम तलाव तयार करून फोटो काढले. त्या पाण्यात मागून स्वच्छ पाणी टाकण्यात आलं, पण लोकांनी पाइपचा फोटो काढला आणि सत्य बाहेर आलं.'
यावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा 'मतांची चोरी' (Vote Chori) या आरोपाची पुनरावृत्ती करत भाजपावर हल्लाबोल केला. 'त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणुका चोरल्या, आणि आता बिहारमध्येही तसंच करण्याचा प्रयत्न करतील,' असा दावा राहुल गांधींनी केला.
काँग्रेस नेत्याने आर्थिक मुद्द्यांवरही मोदी सरकारला लक्ष्य केले. नोटाबंदी आणि जीएसटी धोरणामुळे छोट्या व्यवसायांचा नाश झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. 'आज प्रत्येक मोबाईलच्या मागे ‘Made in China’ लिहिलं आहे. मोदीजींनी भारतातील लघुउद्योग संपवले. आम्ही म्हणतो; हे ‘Made in China’ नसून ‘Made in Bihar’ असावं. बिहारमधील युवकांना रोजगार मिळावा, हीच आमची इच्छा आहे,' असं राहुल गांधींनी जाहीर सभेत सांगितलं.
दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींना 'लोकल गूंडा' असे संबोधत म्हटलं की, "राहुल गांधींनी बिहार आणि भारतातील गरीब मतदारांचा अपमान केला आहे. ते लोकशाहीची थट्टा करत आहेत.'
बिहारमध्ये महागठबंधन आणि एनडीए यांच्यातील ही निवडणूक लढत अधिक रंगतदार बनली आहे. राहुल गांधींच्या या विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, प्रचाराच्या पुढच्या टप्प्यांमध्ये मोदी विरुद्ध राहुल यांच्यातील शब्दयुद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.