रामदास कदमांचे खळबळजनक आरोप, संजय राऊतांचा पलटवार : दसरा मेळाव्यानंतर राजकारण पेटलं
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कदम यांनी प्रथमच असा गंभीर आरोप केला की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह तब्बल दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. एवढंच नाही तर बाळासाहेबांच्या हाताचे ठसेदेखील घेण्यात आले होते. "हे ठसे नेमके कशासाठी घेतले गेले? मृतदेह इतका वेळ का ठेवण्यात आला? मातोश्रीच्या आत नेमकं काय सुरू होतं?" असे सवाल त्यांनी उघडपणे उपस्थित केले.
कदम पुढे म्हणाले की, "मी स्वतः आठ दिवस मातोश्रीच्या आवारात होतो. त्या काळात काय चाललं आहे हे आम्हाला समजत होतं. बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीसुद्धा मला काही माहिती दिली होती. त्यांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला गेला याचं कारण माझ्या लक्षात आलं नाही. तसेच त्यांचे हाताचे ठसे घेण्यात आल्याचं मला सांगण्यात आलं, पण त्यामागचा हेतू आजवर स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे आज मला ही गोष्ट सांगावीशी वाटली."
कदमांच्या या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत पलटवार करताना कदमांच्या वक्तव्याला पूर्णतः फेटाळून लावलं. राऊत म्हणाले, "बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत मी स्वतः मातोश्रीवर होतो. मात्र कदम तेव्हा तिथे नव्हते. आम्ही बाळासाहेबांच्या आजारपणात शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्या काळात काय घडलं, याची खरी माहिती आम्हालाच आहे. आता कुणाच्या दबावाखाली किंवा भीतीपोटी त्यांच्या तोंडात कुणीतरी काही घालून दिलं आणि ते बोलत असतील तर त्याचं उत्तर काय द्यायचं?"
राऊत यांनी पुढे बाळासाहेबांच्या स्मृतीचा उल्लेख करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "शिवसेनाप्रमुखांना जाऊन आज दहा वर्षं लोटली आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीचा काळ आता सुरू आहे. अशा वेळी त्यांनी घडवलेल्या कार्यावर बोलण्याऐवजी त्यांच्याबाबत अशा शंका उपस्थित करणं म्हणजे बाळासाहेबांशीच बेईमानी करणं आहे. ज्या बाळासाहेबांनी आम्हाला आणि तुम्हालाही मोठं केलं, त्यांच्यावर आरोप करणे म्हणजे त्यांच्या वारशाचा अपमान आहे."
रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळला असून दसरा मेळाव्यानंतर राजकारण नव्या वादात अडकले आहे. आता या आरोप-प्रत्यारोपाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.