कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत 99.96 टक्के विक्रमी मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, उद्या होणार फैसला

गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली, तर त्यांच्या विरोधात महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकवटले होते.

कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत 99.96 टक्के विक्रमी मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, उद्या होणार फैसला
Gokul milk union election

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीच्या आणि उत्साही वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली, तर त्यांच्या विरोधात महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकवटले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर महायुतीच्या नेत्यांनी मोठी मोर्चेबांधणी करत सतेज पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. दोन्ही गटांनी आपल्या सर्व ठरावधारकांना मतदानासाठी आणण्यासाठी विशेष नियोजन केले होते. अखेर सर्व आरोप-प्रत्यारोपांनंतर आज मतदानाचा दिवस शांततेत पार पडला.

तालुका निहाय विक्रमी मतदान

गोकुळ दूध संघाच्या या अत्यंत प्रतिष्ठीत निवडणुकीत मतदारांनी अभूतपूर्व असा उत्साह दाखवला. जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील एकूण 5,418 मतदारांपैकी तब्बल 5,416 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.96 टक्के इतकी नोंदवली गेली. विशेष म्हणजे, करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या 10 तालुक्यांमध्ये 100 टक्के मतदान झाले. याशिवाय आजरा तालुक्यात 99.67 टक्के आणि गडहिंग्लज तालुक्यात 99.75 टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण मतदारांमध्ये 4,038 पुरुष आणि 1,378 महिला मतदारांचा सहभाग होता, ज्यांनी संघाच्या भवितव्यासाठी आपला कौल दिला.

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुणे निवडणुकीच्या रिंगणात; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी घेतला मोठा निर्णय

उद्या मतमोजणी; गोकुळच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार?

केवळ आजरा आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक मत कमी पडल्यामुळे ही सरासरी 99.96 टक्के राहिली, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात शतकी मतदान झाले असते. निवडणुकीतील अटीतटीची लढत आणि काही ठिकाणी संभाव्य ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातील धाकधूक वाढली आहे. उद्या सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी 1.00 वाजेपर्यंत गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर नेमका कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होईल. या निकालावर आगामी काळातील जिल्ह्याचे राजकारण मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number