Sahar Shaikh: बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. काही दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याची चर्चा असतानाच त्या अचानक मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल सामना पाहताना दिसल्या. त्यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थलांतरितांसाठी लागू असलेल्या नियमांऐवजी चुकीचा नमुना वापरून प्रशासनाची दिशाभूल केल्याची तक्रारही समोर आली आहे. या सर्व आरोपांची सध्या चौकशी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
चौकशीदरम्यान सहर शेख ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, या चर्चांना छेद देत त्या थेट वानखेडे स्टेडियममध्ये दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या मुंबई इंडियन्सच्या सामन्याचा आनंद घेताना गॅलरीत दिसल्या.


याचवेळी सहर शेख यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्टेडियममधील एक व्हिडिओ शेअर केला. “गेम ओव्हर” असा मजकूर टाकत त्यांनी पोस्ट केल्याने त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी हा पोस्ट त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर सूचक भाष्य असल्याचे म्हटले, तर काहींनी हा केवळ योगायोग असल्याचं मत व्यक्त केलं.
या प्रकरणात ठाणे प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. कागदपत्रांमध्ये आढळलेल्या त्रुटींचा अभ्यास केला जात असून, जात पडताळणी समितीचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. जर हे प्रमाणपत्र अवैध ठरले, तर सहर शेख यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला चौकशी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला सहर शेख यांच्या स्टेडियममधील उपस्थितीने चर्चेला वेगळंच वळण दिलं आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.