Friday, November 07, 2025 11:49:21 AM

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजेंबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली

संजय गायकवाड यांच्या छत्रपतींबाबतच्या वक्तव्यावरून वाद; सोशल मीडियावर संताप, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रात नव्या राजकीय हालचालींची शक्यता.

 छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजेंबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली

लातूर: राज्याच्या राजकारणात मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदर्भ निघाला, की तो विषय अत्यंत भावनात्मक असतो. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लातूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच टीकेच्या सुरात बोलताना गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप होत आहे.

संभाजीराजेंना उद्देशून ‘मूर्ख होते का?’ असा सवाल

गायकवाड म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?' हे वक्तव्य करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे भाषाशिक्षणाचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. मात्र या विधानात छत्रपतींबाबत वापरलेला शब्दप्रयोग अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक ठरला आहे. ते पुढे म्हणाले, 'फक्त हिंदीच नाही, तर जगात टिकायचं असेल तर अनेक भाषा शिकाव्या लागतात. शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनीही विविध भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मूर्ख होते का?'

हेही वाचा: 'विजयी मेळावा' की निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी? आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

सामाजिक माध्यमांवर संतापाचा उद्रेक

गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नागरिकांनी त्यांच्यावर छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला असून माफी मागण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांकडूनही गायकवाड यांच्यावर टीका सुरू झाली आहे. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाचीही अडचण वाढण्याची शक्यता आहे.

काल ठाकरे बंधूंचा भव्य विजयी मेळावा

काल मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत भव्य विजयी मेळावा पार पाडला. या ऐतिहासिक मेळाव्यात मराठी अस्मिता, राज्याची सांस्कृतिक ओळख आणि जनतेच्या अपेक्षांवर प्रकाश टाकण्यात आला. दोघा ठाकरे बंधूंनी एकत्रित व्यासपीठावरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेकडूनही या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.


सम्बन्धित सामग्री