Sunday, June 15, 2025 10:55:51 AM

'नाशिकचं अनाथ आश्रम केलंय' राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

संजय राऊतांनी नाशिकची दुर्दशा, पाणी, कचरा, बेरोजगारीवर मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. कुंभमेळ्यातच लक्ष, इतरवेळी दुर्लक्ष, शिवसेना सतत संघर्षात राहील.

नाशिकचं अनाथ आश्रम केलंय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचा उल्लेख वारंवार केला असला तरी आज नाशिकची वास्तविक परिस्थिती अत्यंत वाईट असून, हे शहर आता 'अनाथ आश्रम' झालं आहे, अशी कडवी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान करत मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

सध्या नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री सातत्याने बैठकांचं आयोजन करत आहेत. मात्र, संजय राऊत यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, 'मुख्यमंत्री येतात, कुंभमेळ्याच्या बैठका घेतात, योजना जाहीर होतात... पण प्रत्यक्षात नाशिक शहर कशा अवस्थेत आहे, याकडे कुणीही लक्ष देत नाही. हेच खरे चित्र आहे.'

हेही वाचा: बीडमध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढावी लागली, तर 1523 गर्भवतींच्या हातात कोयता; महिला ऊसतोड कामगारांचं धक्कादायक वास्तव उघड

'नाशिकचे अनाथ आश्रम केलंय...'

'तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते, हे जाहीर करून मोठं राजकारण केलं. पण आज नाशिकच्या रस्त्यांची अवस्था, नागरी सुविधा, पाणीप्रश्न, कचऱ्याची समस्या आणि बेरोजगारीचं प्रमाण पाहिलं तर हे शहर अनाथासारखं वाटतं. ना पालकमंत्री काही करत आहेत, ना स्थानिक प्रशासन. त्यामुळे आम्ही विचारतो की, हीच तुमची दत्तक घेण्याची व्याख्या आहे का?' असा थेट सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे सांगितलं की, 'नाशिक शहराला केवळ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आठवलं जातं. परंतु इतरवेळी या शहराच्या गरजा, समस्या दुर्लक्षित केल्या जातात. युवक बेरोजगार आहेत, पायाभूत सुविधा ढासळल्या आहेत आणि सामान्य जनतेचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत.'

हेही वाचा: नियमबाह्य प्राचार्य-प्राध्यापक भरतीप्रकरणी 40 महाविद्यालयांना विद्यापीठाची नोटीस; 1 लाख दंड आणि प्रवेशबंदीचा इशारा

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघर्ष सुरूच राहील -राऊत

खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं की, नाशिककरांसाठी शिवसेना नेहमी आवाज उठवत राहील. 'नाशिकमधील जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि आम्ही त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवतो. हे सरकार केवळ प्रचारात समाधानी आहे. प्रत्यक्षात विकास कुठेच दिसत नाही,' असा आरोप त्यांनी केला.

नाशिकमधील कुंभमेळा हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासाठी योजना आणि सोयी आवश्यक आहेत. सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलेले असून अशा वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय समीकरणं कशी बदलतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री