छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या महायुती प्रचारसभेत शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. “आम्ही 2022 मध्ये बंड करण्याचे धाडस दाखवले म्हणूनच आज मी राज्याचा मंत्री म्हणून या मंचावर उभा आहे,” अशी जाहीर कबुली त्यांनी दिली. 2022 च्या राजकीय सत्तांतराच्या वेळी तीव्र स्पर्धा आणि संघर्ष सहन करावा लागला, असे सांगतानाच त्यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांचे मनापासून कौतुक केले. अजित दादा महायुतीमध्ये सामील होतील हे आपले भाकीत तंतोतंत खरे ठरल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
हेही वाचा – राम शिंदेंची ऐनवेळी माघार; अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नेमकं कारण काय?
कार्यकर्ता हीच खरी शक्ती; बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच यश मिळाल्याची भावना
आपल्या भाषणात संजय शिरसाट यांनी कार्यकर्त्यांच्या महत्त्वावर विशेष भर दिला. “कार्यकर्ता ही पक्षाची ढाल आणि कवचकुंडल असते, हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विधान मी कधीही विसरत नाही,” असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे श्रेय बाळासाहेबांच्या आशीर्वादाला दिले. स्वतःच्या मतदारसंघाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, अवघ्या 20 किलोमीटरच्या परिघात 4 लाख मतदार असतानाही 30 टक्के भागांत पोहोचणे कठीण जाते; अशा वेळी केवळ कार्यकर्तेच पक्षाची धुरा सांभाळतात. सलग चार वेळा जनतेने निवडून दिल्याचा किस्सा सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा कानमंत्र महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना दिला.
सतीश चव्हाणांना पाठिंब्याची ग्वाही
मराठवाड्यातील 76 तालुके, 18 दिवसांचा अल्प कालावधी आणि दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणे अत्यंत कठीण असल्याचे शिरसाट म्हणाले. “मी कधी पदवीधर झालो तरी ही निवडणूक कधीच लढवणार नाही,” असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. महायुतीची उमेदवारी अधिकृतपणे उशिरा जाहीर झाली असली, तरी सतीश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्ज भरण्याची पूर्वतयारी केली होती, असा गुप्त खुलासाही त्यांनी केला. महाविकास आघाडीचा पराभव करून सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत, निवडणुकीत काहीही अडचण आल्यास मी खंबीरपणे पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.