Santosh Dhuri Joins BJP: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. वरळीतील मनसेचे आक्रमक नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणाऱ्या धुरी यांनी बाहेर पडताना पक्षांतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष धुरी यांनी खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, ‘संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही दिसले नाही पाहिजेत, असे आदेश वांद्रेच्या बंगल्यावरून देण्यात आले होते. ज्यांच्यामुळे पक्ष फुटला, त्यांनाच राज ठाकरेंनी जवळ केले, हे पाहून वाईट वाटते. मनसेमध्ये माझी कदर केली गेली नाही.’ संदीप देशपांडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, ‘मी संदीपला सोबत येण्यास सांगितले होते, पण त्यांनी नकार दिला. संदीपचे मन मोठे आहे, पण तिथल्या राजकारणात आता राहण्यात अर्थ नव्हता.’
जागावाटपावरून मनसेवर टीका
उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपावरही धुरी यांनी तोफ डागली. माहीम, दादर, वरळी यांसारख्या मराठा बहुल भागांत मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरेंनी मनसेला अशाच जागा दिल्या जिथे त्यांचे स्वतःचे उमेदवार नव्हते किंवा जिथे विद्यमान नगरसेवकांबद्दल नाराजी होती. या 52 जागांपैकी 8 जागा तरी निवडून येतील का, याची शाश्वती नाही, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
कोण आहेत संतोष धुरी?
संतोष धुरी हे मनसेचे कट्टर कार्यकर्ते आणि राज ठाकरेंचे विश्वासू मानले जात. ते मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांचे अत्यंत जवळचे मित्र असून मनसेच्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर असायचे. आगामी निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक 194 मधून इच्छुक होते, मात्र ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत भाजपची वाट धरली.