Jalna Mahapalika Election Result: देशात गाजलेल्या पत्रकार गौरी लंकेश मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिका निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 13 'ड' मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या पांगारकर यांनी भाजपसह सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारली. विशेष म्हणजे, गंभीर गुन्हेगारी खटले सुरू असताना आणि जामिनावर बाहेर असताना त्यांनी मिळवलेल्या या विजयाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निकालाचे समीकरण
पांगारकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा 144 मतांच्या निसटत्या फरकाने पराभव केला. या प्रभागात त्यांना एकूण 2621 मते मिळाली. या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला नव्हता, ज्यामुळे पांगारकर यांचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना पांगारकर म्हणाले, माझ्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत आणि ते न्यायप्रविष्ठ आहेत. परंतु, जनतेच्या न्यायालयाने आज मला न्याय दिला आहे.
कोण आहेत श्रीकांत पांगारकर?
श्रीकांत पांगारकर यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्यावरील आरोप अत्यंत वादग्रस्त राहिले आहेत. पांगारकर यांनी 2001 ते 2006 या काळात अविभक्त शिवसेनेकडून जालन्यात नगरसेवक म्हणून काम केले होते. 2018 मध्ये नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने (ATS) त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर यूएपीए (UAPA) आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
गौरी लंकेश हत्या प्रकरण
दरम्यान, बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मृत्यूच्या कटात सहभागी असल्याचा संशय त्यांच्यावर असून, या प्रकरणात ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पांगारकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र राज्यभरातून झालेल्या तीव्र टिकेनंतर त्यांचा पक्षप्रवेश रोखण्यात आला होता. आता अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींना मिळणारा जनतेचा कौल यावर नवा वाद सुरू झाला आहे.