श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलला यश आले असून, त्यांचे 21 उमेदवार निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या लोकनेते विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांना त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार आणि बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचे आव्हान होते. 3 पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपापल्या परीने ताकद लावली, मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वरमधील गावागावात जाऊन प्रचार केला होता, त्यामुळे मतदारांनी त्यांच्या बाजूने विजयाचा कौल दिला.
अनेक वर्षांपासून सोमेश्वर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात होता. गेल्या वेळेस अजितदादांनी सोमेश्वर कारखाना निवडणुकीत त्यांची आमदारकी पणाला लावली होती, त्याबरोबरच त्यांच्या विजयाची मालिका अशीच सुरू ठेवत सुनेत्रा पवार यांच्या 21 उमेदवारांना घवघवीत यश मिळाले.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावरील भावुक पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय?
दादांनी रुजवलेला विश्वास, सभासदांनी दिलेला कौल… हा विजय आदरणीय दादांच्या कार्याला समर्पित!
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2026-31) ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल’ वर विश्वास दाखवून घवघवीत विजय मिळवून दिल्याबद्दल सर्व सभासद मतदारांचे मनःपूर्वक आभार आणि सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तब्बल 34 वर्षे आदरणीय अजितदादांनी सोमेश्वरच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. कारखान्याशी त्यांनी जोडलेले अतूट नाते, सभासद शेतकऱ्यांसाठी पाहिलेली स्वप्ने आणि त्यांनी जपलेला सहकाराचा वारसा, याचाच हा विजय आहे. दादांनी दाखवलेल्या मार्गावर चालून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
आमच्या सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, हीच आमची ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन, सभासदांचे हित, शेतकऱ्यांची समृद्धी आणि सोमेश्वरची प्रगती साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा विजय हा केवळ आनंदाचा क्षण नसून, दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे!