बारामती: राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्जांपासून माघारीपर्यंत अनेक घडामोडींमुळे ही पोटनिवडणूक चर्चेत राहिली आहे.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बोलताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे तसेच धनगर समाजाचे विशेष आभार मानले. निवडणुकीदरम्यान विविध समाजघटकांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे अधिक बळकट झाल्याचे त्यांनी म्हटले. विशेषतः धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचे सांगत त्यांनी या समाजाचे जाहीर आभार व्यक्त केले.
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, प्रचाराच्या सांगता सभा मोठ्या प्रमाणावर होणार असून, महायुतीचे अनेक दिग्गज नेते बारामतीत येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या सभांना उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बारामती पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुती आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार सुरू असून, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बारामतीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचेही आभार मानत, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला आहे. मात्र हा प्रतिसाद मतदानाच्या दिवशी कितपत मतांमध्ये रूपांतरित होतो आणि बारामतीकरांचा कौल कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.