तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर संपुष्टात आला असून अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी सत्ता स्थापनेचा मार्ग आता जवळपास निश्चित मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही बहुमतापासून काही पावले दूर राहिलेल्या टीव्हीकेला आता काँग्रेससह डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात यश आले आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीकेने पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत तब्बल 108 जागांवर विजय मिळवला. द्रमुक आणि अण्णाद्रमुकसारख्या पारंपरिक पक्षांना मागे टाकत विजय यांनी राज्याच्या राजकारणात मोठी एंट्री केली.
मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला 118 आमदारांचा आकडा टीव्हीकेला गाठता आला नव्हता. विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवला असल्याने पक्षाकडे प्रत्यक्षात 107 आमदारांचे संख्याबळ होते. त्यामुळे पुढील काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता.
या काळात विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकरयांची दोन वेळा भेट घेतली. सुरुवातीला काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला आणि पक्षाचे संख्याबळ 113 वर पोहोचले. मात्र, राज्यपालांनी स्पष्ट बहुमताचे पत्र सादर करण्याची अट घातली होती.
यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि व्हीसीके या तीन लहान पक्षांनीही विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत टीव्हीकेला समर्थन दिले. या तिन्ही पक्षांकडे मिळून सहा आमदार आहेत. त्यामुळे टीव्हीकेने 118 चा बहुमताचा आकडा पार केला.
या घडामोडीनंतर आता विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ‘शिट्टी’ हे चिन्ह आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे टीव्हीकेने मोठी लाट निर्माण केली होती. त्याचा फायदा पक्षाला मतदानातही झाला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुककडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, अखेरीस काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी विजय यांच्या बाजूने उभे राहत समीकरण पूर्णपणे बदलले.
पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागा जिंकून सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचलेले विजय आता तमिळनाडूच्या राजकारणातील नवे केंद्रबिंदू बनले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणाऱ्या शपथविधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.