जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीत वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर भाजपने सुद्धा तात्काळ बैठक घेऊन जळगाव जिल्ह्यात नगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले. महायुतीतील दोन पक्षांकडून अशाप्रकारे घोषणा झाल्याने जळगावात महायुती फुटल्याचे दिसत आहे.
यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी उघड चॅलेंज दिलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. थोडे दिवस वाट पाहा, माझ्या निर्णयासोबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सहमत होईल. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती आपल्याला दिसेल, बहुतांश ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्ष आपल्याला स्वबळावरच निवडणूक लढताना दिसतील, असेही किशोर पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा: MNS Deepotsav 2025: उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन
आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीच्या तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळाली होती. आता याच पार्श्वभूमीवर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा जागा वाटपावरून महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. मात्र अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. यातच आता किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे.
किशोर पाटील यांनी आधीच आपल्या पाचोरा भडगाव मतदार संघात स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पाटील यांच्या भूमिकेनंतर भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही तातडीची बैठक घेऊन भडगाव पाचोरामध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये फुट पडल्याची चर्चा आहे.