रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, ‘मुंबईत गँगची दादागिरी खपवून घेणार नाही’

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, ‘मुंबईत गँगची दादागिरी खपवून घेणार नाही’

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

काल संध्याकाळी विले पार्ले परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. या घटनेनंतर शिंदे यांनी थेट त्याच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली आणि कुटुंबियांना धीर दिला. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, टायगर श्रॉफवर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण श्रॉफ कुटुंबीय दहशतीखाली असून, विशेषतः त्याची आई आयेशा श्रॉफ या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. कोणताही वाद नसताना एका तरुण अभिनेत्यावर असा जीवघेणा हल्ला होणे धक्कादायक आहे.

विशेष पथक तयार, आरोपींवर कठोर कारवाई होणार
या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस आयुक्तांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या गुन्हेगारांना तात्काळ पकडून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

हेही वाचा – टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अंधेरी स्थानकावर दुचाकी सोडून पसार; पोलिसांकडून तपासाला वेग

बिश्नोई गँगला थेट इशारा
चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बिश्नोई गँगसह इतर टोळ्यांकडून सेलिब्रिटींना धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत. यावर बोलताना शिंदे म्हणाले, “मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोणत्याही गँगची दहशत खपवून घेतली जाणार नाही. जो कुणी असे प्रयत्न करेल, त्याला पोलीस जशास तसे उत्तर देतील.”

90 च्या दशकाप्रमाणे गँगवार संपवणार
90 च्या दशकात मुंबईतील गँगवार पोलिसांनी संपवला होता, आताही कोणी दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडले जाणार नाही, असा कडक इशाराही शिंदे यांनी दिला.

सरकार कलाकारांच्या पाठीशी – शिंदे यांचे आवाहन
सर्वसामान्य नागरिक आणि सेलिब्रिटींची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा धमक्या आल्यास तात्काळ मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version