Waris Pathan: ‘अंबानींना मराठी बोलायला सांगणार का?’ मराठी सक्तीच्या अल्टिमेटमवरून वारिस पठाण यांचा हल्लाबोल

भाषेच्या मुद्द्यावरून सामान्य टॅक्सी-रिक्षाचालकांना लक्ष्य करणे आणि हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे चुकीचे असल्याचे सांगत पठाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला.<br/>

Waris Pathan: ‘अंबानींना मराठी बोलायला सांगणार का?’  मराठी सक्तीच्या अल्टिमेटमवरून वारिस पठाण यांचा हल्लाबोल

Waris Pathan: महाराष्ट्राची राजधानी आणि रोजगाराचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा भाषेवरून राजकारण तापले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेच्या वापराबाबत देण्यात आलेल्या अल्टिमेटमवर ‘एमआयएम’ (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. भाषेच्या मुद्द्यावरून सामान्य टॅक्सी-रिक्षाचालकांना लक्ष्य करणे आणि हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे चुकीचे असल्याचे सांगत पठाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई ‘स्वप्नांचे शहर’; प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार

वारिस पठाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, मुंबई हे केवळ एक शहर नसून देशभरातील लोकांसाठी ‘स्वप्नांचे शहर’ आहे. लोक इथे आपल्या रोजगाराच्या आणि चांगल्या भविष्यासाठी येतात. रात्रं-दिवस कष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करतात आणि या शहरात राहून समाजात प्रतिष्ठा व आदरही मिळवतात. अशा वेळी केवळ भाषेच्या कारणावरून हातावर पोट असणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना धमकावणे किंवा त्यांना अल्टिमेटम देणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.

हेही वाचा – Mumbai: ‘मांसाहारी असाल तर घर नाही मिळणार’; ताडदेवमधील फ्लॅटच्या जाहिरातीने वाद पेटला, ठाकरे गट अन् मनसे आक्रमक

“अंबानींना मराठी बोलायला सांगणार का?” पठाण यांचा थेट सवाल

आपल्या वक्तव्यात वारिस पठाण यांनी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर थेट सवाल उपस्थित केला. “मुंबईत अनेक नामवंत कलाकार, व्यावसायिक आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वास्तव्यास आहेत. जर तुम्ही सामान्य रिक्षाचालकांना मराठीची सक्ती करत असाल, तर मुकेश अंबानींसारख्या बड्या आणि श्रीमंत व्यक्तीला मराठी बोलण्याचा आग्रह धरू शकाल का? ते खरोखर मराठीत बोलतील का?” असा सवाल करत त्यांनी मनसेच्या भूमिकेवर आणि निवडक सक्तीवर टीका केली.

भाषेचा आदर आवश्यक, पण हिंसाचार अयोग्य

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर केला पाहिजे, यावर पठाण यांनी सहमती दर्शवली. “आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे मराठी भाषा येणे नक्कीच महत्त्वाचे आहे. परंतु, परप्रांतीय किंवा इतर भाषिकांना मराठी शिकण्यासाठी काहीसा वेळ दिला पाहिजे,” असे पठाण म्हणाले. भाषा शिकणे ही एक प्रक्रिया आहे आणि ती कोणावरही जबरदस्तीने किंवा भीती दाखवून लादता येत नाही. केवळ भाषा येत नाही म्हणून एखाद्या सामान्य नागरिकाविरुद्ध किंवा कामगाराविरुद्ध हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे पूर्णपणे चुकीचे आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असे मत त्यांनी ठामपणे मांडले. मुंबईतील कामगार आणि परप्रांतीयांच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे आणि भाषेच्या नावाखाली होणारी दादागिरी थांबली पाहिजे, असे सांगत वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number