Sharad Pawar On Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणावरून सुरू असलेल्या वादात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवा दावा केला आहे. "आमच्या अंतर्गत चर्चांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याची माहिती बाहेरच्यांना कशी असू शकते?" असा सवाल करत पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाच्या नेत्यांचे दावे सपशेल फेटाळून लावले आहेत.
पवारांचा 'सडेतोड' प्रतिवाद
सोमवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. दोन दिवसांपूर्वीच पवारांनी खुलासा केला होता की, 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येण्याची अधिकृत घोषणा होणार होती. मात्र, फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांनी असे कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे म्हटले होते. यावर पवार म्हणाले, 'एकत्रिकरणाची चर्चा ही पक्षांतर्गत होती. जे लोक या प्रक्रियेचा भागच नव्हते, त्यांना त्याबद्दल माहिती असण्याचे कारण नाही.' मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे संकेत देत पवारांनी आपली भूमिका अधिक ठाम केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचा 'मैत्रीचा' दावा
याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावताना अजित पवारांशी असलेल्या मैत्रीचा दाखला दिला होता. "अजितदादा माझे उत्तम मित्र होते आणि ते प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करायचे. एवढा मोठा निर्णय त्यांनी भाजपला किंवा मला सांगितला नसता, हे पटण्यासारखे नाही," असे फडणवीस म्हणाले होते. तसेच, भविष्यात अशा हालचाली झाल्यास भाजपनेत्यांशी सल्लामसलत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सुचवले होते.