Devendra Fadanvis On Heavy Rain In Marathwada: मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेला आहे. गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. बुधवारी 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पावसाच्या पाण्यामुळे संसार विस्कटला, घरं पडली आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक घराला अंधाराच्या साम्राज्याने ग्रासलेलं आहे. पुराच्या पाण्यानं सगळं धुवून गेलं आणि खरडून गेलं. मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23 लाख 414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान मराठवाड्यात अचानक अतिवृष्टी का झाली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मराठवाड्यातील पुराचं सर्वात मोठं कारण क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदलआहे. हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसत आहे. मराठवाड्याला गेल्या दहा ते पंधरा वर्षात दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटाला सामोरे जावं लागतं आहे. त्यावर जागतिक बँकेने दिलेले सहा हजार कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसात राज्यातील सर्वच भागात जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही भागात आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे.