Baramati Election: राज्याचे राजकारण एका मोठ्या वळणावर येऊन ठेपले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीच्या वेगाने घडामोडी घडल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर, आता काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
शरद पवार-खरगे चर्चेने 'भाकरी फिरली'
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आपल्या उमेदवारीवर ठाम होती. मात्र, तासाभरापूर्वी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण चर्चेनंतर संपूर्ण चित्र बदलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरगे यांनी बारामतीतून काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याचे आश्वासन पवारांना दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काही वेळातच याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता असून, दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवार आकाश मोरे आपला अर्ज मागे घेऊ शकतात.
विजय वडेट्टीवारांनी दिले स्पष्ट संकेत
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, "अजित पवारांविषयी जनसामान्यांच्या मनात असलेल्या भावना आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे स्थान पाहता, ही निवडणूक लढवू नये असा सूर पक्षात उमटला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील प्रमुख नेत्यांचे उमेदवारी मागे घेण्याबाबत एकमत झाले असून, आम्ही तसा निरोप दिल्लीला कळवला आहे. हायकमांडचा आदेश मिळताच माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल."
नेत्यांच्या विनंतीला यश?
केवळ शरद पवारच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही माघारीसाठी विनंती केली होती. या सर्व प्रयत्नांना यश येताना दिसत असून, बारामतीमध्ये आता सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय सुसंस्कृतपणाचे दर्शन?
एका बाजूला भाजपने यापूर्वी अनेक पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोधची परंपरा पाळली नव्हती, अशी टीका वडेट्टीवारांनी केली असली, तरी अजित पवारांच्या निधनानंतरची ही निवडणूक कौटुंबिक आणि भावनिक असल्याने काँग्रेसने माघार घेण्याचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दुपारी 2 वाजता काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. जर काँग्रेसने अर्ज मागे घेतला, तर बारामतीची ही ऐतिहासिक पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब होईल.