मुंबई: विराट कोहली 12 वर्षानंतर रणजी सामना खेळणार आहे. हा सामना 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना आयोजित केला जाणार आहे. दिल्ली विरुद्ध रेल्वे संघाच्या सामन्याचं मुख्य आकर्षण आहे विराट कोहली. विराटच्या येण्याने दिल्लीचा संघ अजून बळकट होईल असं दिल्ली संघाचे प्रशिक्षक सरणदीप सिंग यांचं म्हणणं आहे. विराट कोहली २८ तारखेला दिल्ली संघाबरोबर सर्व सुरु करणार. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली भारतीय संघाचे पूर्व प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत सराव करताना दिसला होता. सूत्रांनुसार, विराट कोहली त्याच्या 'बॅकफूट'च्या खेळावर काम करत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी विराटच्या या कमजोरीवर भर दिला आणि विराटला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरले.
विराट प्रमाणे केएल राहुल कर्नाटक संघामध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. कर्नाटकचा सामना हरियाणा विरुद्ध असेल. हरियाणाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बंगाल संघाला हरवलं होतं. राहुलच्या येण्याने कर्नाटक संघ अजून बळकट झाला आहे. कर्नाटक संघात केएल राहुल, मयंक अगरवाल, प्रसिद्ध कृष्णा आणि देवदत्त पड्डीकल सारखे खेळाडू आहेत.
तसेच रवींद्र जडेजा सौराष्ट्र संघासाठी यावर्षीच्या रणजी हंगामाचा त्याचा शेवटचा सामना खेळणार आहे. सौराष्ट्रचा सामना आसाम संघासोबत आहे. दुखापतीतून बाहेर आलेला भारताचा उदयोन्मुख खेळाडू रियान पराग या सामन्यातून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 2020 नंतर प्रथमच रणजीच्या रिंगणात दिसणार आहे.