IPL 2026: चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा कायमस्वरूपी राहणार रिकाम्या; RCB ने ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार, स्टेडियमच्या एका मुख्य स्टँडमधील 11 जागांची विक्री यापुढे कधीही केली जाणार नाही.

IPL 2026: चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा कायमस्वरूपी राहणार रिकाम्या; RCB ने ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

IPL 2026: आयपीएलच्या 19 व्या हंगामाला (IPL 2026) सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 4 जून 2025 रोजी आरसीबीने आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर झालेल्या जल्लोषात दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत आपला जीव गमावलेल्या 11 चाहत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा आता कायमस्वरूपी रिकाम्या ठेवल्या जाणार आहेत. क्रिकेट विश्वात अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असून, आरसीबीच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चाहत्यांच्या आठवणीसाठी विशेष स्टँड आणि स्मारक
आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार, स्टेडियमच्या एका मुख्य स्टँडमधील 11 जागांची विक्री यापुढे कधीही केली जाणार नाही. आयपीएलसह सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीही हा नियम लागू असेल. याव्यतिरिक्त, ज्या 11 जणांनी आपला प्राण गमावला, त्यांच्या स्मरणार्थ स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक भव्य स्मारक उभारले जाणार आहे. 28 मार्च 2026 रोजी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यापूर्वी या स्मारकाचे अनावरण केले जाईल. सामन्याच्या दिवशी स्टेडियममधील जायंट स्क्रीनवर मृतांची नावे प्रदर्शित करून एक मिनिटाचे मौनही पाळले जाणार आहे.

सराव सत्रात खेळाडू परिधान करणार '11' क्रमांकाची जर्सी
या हंगामात आरसीबीचे खेळाडू केवळ मैदानातच नव्हे, तर सराव सत्रातही या 11 चाहत्यांना विसरणार नाहीत. आदरांजली म्हणून सर्व खेळाडू सरावाच्या वेळी 11 क्रमांकाची जर्सी परिधान करतील. फ्रँचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश मेनन यांनी सांगितले की, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कर्नाटक सरकार आणि पोलिसांच्या सहकार्याने कडक 'SOPs' (प्रमाणित कार्यपद्धती) लागू करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आता स्टेडियमवर अधिक काटेकोर नियोजन केले जाणार आहे.

हेही वाचा – South Africa vs India Women: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा; अनुष्का शर्माला प्रथमच संधी

IPL 2026 चा श्रीगणेशा: RCB विरुद्ध SRH
आयपीएल 2026 चा उद्घाटन सोहळा आणि पहिला सामना 28 मार्च रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. या सलामीच्या लढतीत यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) होईल. आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे, तर पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ईशान किशन हैदराबादच्या संघाची धुरा सांभाळताना दिसेल. विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या आरसीबीसाठी हा सामना भावनिकदृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number