Wednesday, February 18, 2026 06:35:51 PM

Ind vs Nz 1st T20 : विश्वचषकापूर्वी धाकधूक वाढली, संजू-इशानची स्वस्तात बाद; 3 ओव्हर्समध्ये टीम इंडियाची दाणादाण

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची आघाडीची फळी अवघ्या 18 चेंडूंत गडगडल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ind vs nz 1st t20  विश्वचषकापूर्वी धाकधूक वाढली संजू-इशानची स्वस्तात बाद 3 ओव्हर्समध्ये टीम इंडियाची दाणादाण

Ind vs Nz 1st T20 :  T-20 विश्वचषक 2026 च्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची मानली जाणारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका आजपासून नागपुरात सुरू झाली. मात्र, पहिल्याच सामन्यात भारताची सुरुवात 'काळ्या दिवसा'सारखी झाली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची आघाडीची फळी अवघ्या 18 चेंडूंत गडगडल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजू-इशानची स्वस्तात एक्झिट; चाहत्यांचा हिरमोड

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली. मात्र, न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत. दुसऱ्या षटकात दोन देखणे चौकार मारून संजू लयीत वाटत होता, पण काईल जेमीसनने त्याला 10 धावांवर असताना जाळ्यात ओढले. 18 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. तथापी, तब्बल 785 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर इशानने मैदानात पाऊल ठेवले, पण त्याचे पुनरागमन अत्यंत निराशाजनक ठरले. जॅकब डफीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो 5 चेंडूत केवळ 8 धावा करून झेलबाद झाला. 27 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला.

हेही वाचा - T20 World Cup 2026 : ICC चा बांगलादेशला 'अल्टीमेटम'; भारताचा दौरा नाकारणे महागात पडणार

कर्णधार सूर्यावर जबाबदारी; प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

आघाडीचे दोन्ही शिलेदार परतल्याने आता कर्णधार सूर्यकुमार यादववर डावाला सावरण्याची मोठी जबाबदारी आहे. नाणेफेकीच्या वेळी बोलताना सूर्याने मान्य केले की, "आम्हालाही प्रथम गोलंदाजीच करायची होती, पण आता फलंदाजीचे आव्हान स्वीकारून मोठी धावसंख्या उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल." विशेष म्हणजे, या सामन्यात श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि रवी बिश्नोई यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेले नाही.

अंतिम अकरा (Playing 11):

भारत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी. 
 


सम्बन्धित सामग्री