मुंबई: बीसीसीआयने मुंबईत विशेष पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सचिन तेंडुलकर, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन समवेत अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश होता.
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, ज्याला नुकताच आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर (2024) पुरस्कार मिळाला, त्याने तिसऱ्यांदा "पोली उमरीगर पुरस्कार" जिंकत सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष) म्हणून सन्मान मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 स्थानावर असलेल्या बुमराहने 2024 मध्ये 13 कसोटी सामन्यांत 71 बळी घेतले आणि भारताच्या विजयश्री खेचून आणणाऱ्या T20 विश्वचषक मोहिमेत "टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू" म्हणूनही गौरवला गेला.
भारताच्या महिला संघाच्या उपकर्णधार स्मृती मंधानाने चौथ्यांदा "सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू" (महिला) पुरस्कार जिंकला. तिने 2024 मध्ये वनडेमध्ये 747 धावा तर T20 सामन्यांमध्ये 763 धावा केल्या. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेन्नई येथे खेळलेल्या आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम 149 धावांच्या खेळीने सर्वांची मने जिंकली.
सरफराज खान आणि आशा शोभना यांना अनुक्रमे पुरुष व महिला गटात "सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण" पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीनंतर क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आर. अश्विन यांना बीसीसीआयने विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले.